एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे
एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे
एक धागा सुखाचा
पांघरसी जरि असला कपडा
येसी उघडा, जासी उघडा
पांघरसी जरि असला कपडा
येसी उघडा, जासी उघडा
कपड्यासाठी करिसी नाटक, तीन प्रवेशांचे
एक धागा सुखाचा
मुकी अंगडी बालपणाची
रंगीत वसने तारुण्याची
मुकी अंगडी बालपणाची
रंगीत वसने तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे
एक धागा सुखाचा
या वस्त्रांतें विणतो कोण ?
एकसारखी नसती दोन
या वस्त्रांतें विणतो कोण ?
एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात
त्या हात विणकर्याचे
एक धागा सुखाचा